नवी मुंबईकरांना सिडकोचा मोठा दिलासा, पुनर्विकासाचा अडथळा दूर

नवी मुंबईतल्या रहिवाशांना सिडकोनं मोठा दिलासा दिलाय. सिडकोच्या जमिनीवरील बांधकांमांच्या पुनर्विकासाला सिडकोचा अडथळा असणार नाही. त्यामुळे रहिवाशांच्या इमारती, समाज मंदिर, क्रीडा संकूल, शाळा आणि इतर संस्थाच्या भाडेपट्ट्याच्या जमिनी त्यांच्याच मालकीचा होणार आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2017, 09:06 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या रहिवाशांना सिडकोनं मोठा दिलासा दिलाय. सिडकोच्या जमिनीवरील बांधकांमांच्या पुनर्विकासाला सिडकोचा अडथळा असणार नाही. त्यामुळे रहिवाशांच्या इमारती, समाज मंदिर, क्रीडा संकूल, शाळा आणि इतर संस्थाच्या भाडेपट्ट्याच्या जमिनी त्यांच्याच मालकीचा होणार आहेत. 

सिडकोच्या अधिका-यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या ३० एप्रिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आता यासंदर्भात सिडको प्रस्ताव तयार करणार आहे. नवी मुंबई शहरातील सिडकोच्या सर्व जमीन फ्री होल्ड करण्यात याव्यात, अशी अनेक वर्षांची मागणी होती, याबाबत मुख्यमंत्र्यांनी जमिनी फ्री करण्याचा प्रस्ताव सिडकोला तयार करण्यास सांगितला आहे, अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नवी मुंबईतील सिडकोच्या ज्या जमिनी लीजवर देण्यात आल्या होत्या त्या जमिनी या सोसायटी तसेच त्या त्या संस्था च्या नांवावर होणार आहेत.

नवी मुंबई शहर उभारण्यासाठी सीडकोने 1970मध्ये 95 गावांची शेतजमीन अधिग्रहण केली. त्यानंतर सिडकीने येथे रहिवाशी वसाहती बांधल्या. तसेच विकासकांना भूखंड विकसित करण्यासाठी दिले. तसेच प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारे साडेबारा टक्क्यांच्या भूखंडाचे वाटप केले. हे सर्व भूखंड देताना सिडकोने मालकी हक्क आपल्याकडे राखून ठेवत 60 वर्षांच्या लीजवर या जमिनी दिल्या.

यामुळे येथील  सोसायटीचा पुनर्विकास करायचा असल्यास सिडकोची परवानगी लागत असे. अनेक जाचक अटींमुळे सिडको याला परवानगी देत नसे. यामुळे अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकास रखडला होता. प्रत्येक बदलासाठी सिडकोची परवानगी आवश्यक ठरली होती. त्यामुळे आता ही अडचण दूर होणार आहे.