काँग्रेस नेत्याची निर्घृण हत्या : चुलत भावासह सात जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृहनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येने भिवंडी पुन्हा एकदा हादरली. चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यानेच हा काटा काढला असून त्याच्यासह सात जणांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, चुलतभाऊ हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 16, 2017, 06:08 PM IST
काँग्रेस नेत्याची निर्घृण हत्या : चुलत भावासह सात जणांवर गुन्हा दाखल title=

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृहनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येने भिवंडी पुन्हा एकदा हादरली. चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यानेच हा काटा काढला असून त्याच्यासह सात जणांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, चुलतभाऊ हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.

मनोज म्हात्रे यांच्यावर गोळीबार करीत तलवार, कोयत्याने हात-पाय तोडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. त्यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यानेच हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी प्रशांतला निवडणूक लढविण्यास मज्जाव केल्याचा राग मनात ठेवून त्याने ही हत्या केल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. मनोज म्हात्रे यांचे मारेकरी अद्यापी फरार आहेत.

गेली २० वर्षे भिवंडीच्या राजकारणात सक्रिय असलेले मनोज म्हात्रे हे मंगळवारी रात्री आपल्या घरी जात असताना इमारतीच्या खाली दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार करून नंतर तलवारी, कोयत्याने निर्घृणपणे वार केले. गंभीर जखमी झालेल्या म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

मनोज म्हात्रे यांच्या गाडीचा चालक प्रदीप म्हात्रे यांने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मनोज म्हात्रे यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यांच्यासह महेश म्हात्रे, रणजीत म्हात्रे, चिरंजीवी म्हात्रे, गणेश पाटील आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.