रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आलीत. केळशी येथील 'आशापुरा माईन्स केमिकल' कंपनीच्या परिसरात टाकलेल्या धाडीत ही स्फोटकं सापडली.
१० बॉक्स जिलेटीन आणि ३२५ डिटोनेटर्स घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत. दहशतवादी विरोधी पथकाच्या ठाणे आणि रत्नागिरी येथील युनिटनं ही कारवाई केली.
या प्रकरणी शेखर विलास देशमुख याला अटक करण्यात आलीय. ठाणे येथे या संदर्भात गुन्हाची नोंद झालीय. जप्त केलेली स्फोटके ही अत्यंत धोकादायक आहेत.
ही स्फोटके 'आशापुरा माईन्स केमिकल' कंपनीने कोणत्याही सुरक्षेशिवाय एका खड्ड्यात लपवून ठेवली होती. त्यामुळेच ही कारवाई केल्याचं दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलीय.
दहशतवादी विरोधी पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात अवैध तसेच असुरक्षितरित्या वापरण्यात येणाऱ्या स्फोटकं, दारूगोळा यावर लक्ष ठेवून त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम उघडलेली आहे. त्यामुळेच केळशी येथील आशापुरा माईन्स केमिकल कंपनीविरोधात या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे..