खबरदार! आपल्या बँक खात्याची माहिती लिक केली तर...

आपल्या एटीएम आणि बँक खात्याची माहिती कधी कुणाला देवू नका, असं सांगूनदेखील निनावी आलेल्या कॉलच्या मदतीने लोकांना फसवलं जातंय. आणि तेही चक्क तीन मिनिटांत... 

Updated: Jul 12, 2014, 10:31 AM IST
खबरदार! आपल्या बँक खात्याची माहिती लिक केली तर... title=

रत्नागिरी : आपल्या एटीएम आणि बँक खात्याची माहिती कधी कुणाला देवू नका, असं सांगूनदेखील निनावी आलेल्या कॉलच्या मदतीने लोकांना फसवलं जातंय. आणि तेही चक्क तीन मिनिटांत... 

‘बँकेचा अधिकारी बोलतोय’ असं सांगून एका भामट्यानं रत्नागिरीतल्या एकाला 20 हजार रुपयाला गंडा घातल्याचं समोर आलंय... 

रत्नागिरीच्या वरवडे गावात राहणारे राजेश भोसले यांच्यासोबत ही धक्कादायक घटना घडलीय. अनोळख्या व्यक्तीला मोबाईल फोनवर एटीएम कार्डची माहिती देणं, त्यांना चांगलंच महाग पडलंय. दोन दिवसांपूर्वी राजेश यांना एका व्यक्तीचा फोन आला. ‘बँक ऑफ इंडिया’मधून बोलतो असं सांगत त्या व्यक्तीने राजेश यांच्या एटीएम कार्डवरचे अचूक आकडे सांगितले. 

‘तुमचं कार्ड बदललं जातंय’ असं सांगणारा हा अनोळखी व्यक्ती बँक अधिकारी असल्याचा राजेश यांचा समज झाला. त्यानं त्याला हवी असलेली माहिती राजेश यांच्याकडून मिळवली आणि फोन सुरु असतानाच अवघ्या तीन मिनिटांत त्यांच्या अकाऊंटमधल्या 20 हजार रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी राजेश यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतलेली नाही.

पैसे काढल्याचा अलर्ट मेसेज राजेश यांना वाचता येऊ नये, यासाठी ही अनोळखी व्यक्ती त्यांना सारखे फोन करत होती. मात्र, हा सारा प्रकार संशयास्पद असल्याची चाहूल राजेश यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्राला आली. त्यानं तात्काळ राजेश यांच्या बँकेत फोन करुन एटीएम ब्लॉक करण्याची विनंती केली. त्यामुळं 20 हजाराहून अधिक जास्त पैसे काढण्यात अनोळख्या व्यक्तीला अपयश आलं आणि राजेश यांचे लाखो रुपये सुरक्षित राहिले.

त्यामुळं मोबाईलवर फोन येणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या भुलथापांना बळी पडू नका... एटीएम आणि बँक खात्याची माहिती कुणालाही देऊ नका. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.