सोलापूर : थकीत बिल न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
एका कंत्राटदार कंपनीचे पैसे थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. जप्तीसाठी आलेल्या अधिका-यांनी अधीक्षक अभियंत्यांना तत्काळ दहा लाख भरण्याची संधी दिली होती. पण अधीक्षक अभियंते आर जे कांबळे यांनी पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे शेवटी अधीक्षकाच्या खुर्चीसह दहा खुर्च्या, एक टेबल आणि दोन संगणक जप्त करण्यात आलेत.
भारत कंट्रक्शन या कंपनीने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिलेली विविध कामे केली आहेत. कामाची बिल न मिळाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. बिलाच्या बदल्यात जप्तीची कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
मंडळाकडून आठ कोटी पंचाहत्तर लाखाचे बिल येणे आहे, न्यायालयाच्या आदेशानुसार आता दहा लाख द्यावेत अन्यथा जप्ती करण्यात येईल, असे अधीक्षकांना सांगण्यात आले. तत्काळ पैसे देण्यास अधीक्षक अभियंत्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली.