नांदेड : तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत आलेली सर्व तूर खरेदी केली जाईल, असं आश्वासन सरकारनं दिलं असलं तरी, प्रत्यक्षात एकाही खरेदी केंद्रावरती अजूनही तूर खरेदी सुरु झालेली नाही. विशेष म्हणजे तूर विकण्यासाठी २२ एप्रिल पूर्वीपासूनच अनेक शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ताटकळत बसून आहेत.
रात्र रात्र जागून आपली तुरीची रखवाली करण्याशिवाय या शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाही. तर नांदेडमधल्या अशाच एका खरेदी केंद्रावरुन प्रत्यक्ष रात्री झी २४ तासनं केलेला हा एक्स्क्लुजिव रिऍलिटी चेक.
हे आहे नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यामधलं नाफेडचं तूर खरेदी केंद्र. २२ एप्रिलपूर्वीच अर्धापूर तालुक्याच्या आसपासच्या ५ तालुक्यांतल्या शेतक-यांनी मोठ्या आशेनं आपली तूर इथे विक्रीसाठी आणली. त्याचं त्यांना टोकनही मिळालं. अशी तब्बल ६ हजार क्विंटल तूर इथे सध्या खरेदीच्या प्रतिक्षेत आहे.
विशेष म्हणजे अर्धापूरच्या तूर खरेदी केंद्रावर साधी वीज आणि पाण्याचीही व्यवस्था नाही. अशाही परिस्थितीत आपल्या लाख मोलाच्या तूरीची दिवसरात्र राखण करण्याची वेळ या पिकवत्या हातांवर आली आहे. झी 24 तास या खरेदी क्रेंद्रावर रात्रीच्या सुमाराला पोहोचली, तेव्हा गैरसोईंचा सामना करत तूरीची राखण करत असलेले शेतकरी पाहायला मिळाले.
ही तूर विकली गेली तरच येणाऱ्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
२२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर विकत घेतली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं खरं. मात्र प्रत्यक्षात एकाही खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरु झालेली नाही. तर नाफेडचा एकही अधिकारी तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलनंतर फिरकलेलाच नाही. त्यामुळे कष्टानं पिकवलेल्या या पिवळ्या सोन्याच्या चिंतेनं, हा हतबल शेतकरी पूरता पोखरला गेला आहे.