नाशिकमध्ये पूरस्थिती काय, पुण्याहून एनडीआरएफची तुकडी नाशिककडे रवाना

नाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच आहे. आजही मंदिरं आणि गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आहे.

Updated: Aug 3, 2016, 09:26 AM IST
नाशिकमध्ये पूरस्थिती काय, पुण्याहून एनडीआरएफची तुकडी नाशिककडे रवाना title=

नाशिक : नाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच आहे. आजही मंदिरं आणि गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आहे. 

आजही नाशिकमधल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. पुढचे दोन दिवस मुसळधार राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आत्तापर्यंत शेकडो कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय.

ठिकठिकाणचे आपत्ती नियंत्रण कक्ष सतर्क झाले असून बचाव कार्य जोमाने सुरु झालंय. देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरमधील दोन चॉपरसह ३०० जवान आपत्कालीन परस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

होळकर पूल बंद

तसंच ब्रिटीशकालीन व्हिक्टोरीया ब्रिज म्हणजेच अहिल्यादेवी होळकर पूल आज सकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितलं जातंय. ही ऐतिहासिक घटना असल्याचं म्हटलं जातंय. 

एनडीआरएफची ४० जणांची तुकडी नाशिककडे रवाना

नाशिकमध्ये गोदावरी नदीनं रुद्रावतार धारण केला असून संपूर्ण शहर जलमय झालंय. गोदावरीनदीनं अत्युच्च पातळी ओलांडल्यामुळं नाशिकमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शहरातले सर्वच पूल पाण्या खाली गेले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुण्याहून एनडीआरएफच्या चाळीस जणांची एक तु़कडी नाशिककडे रवाना करण्यात आली आहे. यात पाच बोटींचीही समावेश आहे.  

तीन जण वाहून गेले

आत्तापर्यंत तीन जण वाहून गेले आहेत मात्र त्यांचा शोध लागलेला नाही. कालिका पंपिंग स्टेशनमध्ये पाणी गेल्यामुळे आज आणि उद्या नाशिक शहरातल्या काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. 

गावांना पुराचा वेढा 

धरणांचा जिल्हा असा लौकीक असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या विक्रमी पाऊस झालाय. तब्बल नाशिक १००.२ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. नाशिक इगतपुरी दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा या तालुक्यात अतिवृष्टीमुळे गोदावरी, दारणा, कादवा या नद्यांना महापूर आलाय. सर्वच महत्त्वाच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात गावांना पुरांचा वेढा पडलाय. 

नाशिक शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पुराची परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्याच्या नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टीमुळे गोदावरी, दारणा, कादवा नदीला महापूर आलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गंगापूर, नांदूरमधमेश्वर, दारणा, पालखेड, कडवा, चणकापूर, पुणे, भोजापूर धरणातून पाणी सोडायला सुरूवात झालीय. नाशिकमधल्या गोदावरीवर असलेल्या होळकर पुलाखालून २३ हजार क्युसेक्स पाणी वाहात आहेत. सायखेडा चांदोरीपासून कोपरगावपर्यंतच्या गावांना पुराचा वेढा पडण्याची स्थिती आहे. नाशिकमधील गोदावरीच्या महापूराचे पाणी वस्त्रांतरगृहाच्या पहिल्या मजल्याला लागले असून कपालेश्‍वर मंदिराच्या सहा पायऱ्या पूराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. नांदूरमधमेश्वरमधून जायकवाडीकडे ७० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यासाठी सकाळी अकरापासून सर्व सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. कादवा नदीला दहा वर्षात पहिल्यांदाच महापूर आल्याने कांद्याची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजारपेठेला पुराचा वेढा पडला आहे. 

नाशिक जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याची स्थिती आहे. 

नाशिक तालुक्यात ९५ मिलीमीटर

इगतपुरी तालुक्यात २१३

दिंडोरीत १४२

पेठ तालुक्यात १२८

त्र्यंबकेश्वरात १२८

मालेगावात ३

नांदगाव १९

चांदवड ४३.८

कळवण ९६.७

बागलाण ५२

सुरगणा १३९.७

देवळा ५९.६

निफाड ५८.६

सिन्नर ३६

येवला २० मिलीमीटर पाऊस झालाय.
 
नाशिक जिल्ह्यात सर्वच महत्त्वाची धरणं आहेत. त्यातच पश्चिम नाशिक जिल्ह्यात म्हणजेच धरणांच्या कॅचमेंट एरियातच सर्वाधिक पाऊस झालाय, त्यामुळे जवळपास सर्वच धऱणातून विसर्ग सुरू झालाय.  

गंगापूर धरणातून १३ हजार ७५२ क्युसेक

पालखेडमधून ३५ हजार ९२८

दारणा धरणातून २१ हजार क्युसेक

कडवा धरणातून १४ हजार क्युसेक

चणकापूरमधून १० हजार

पुणेगाव धरणातून २ हजार ८१७ क्युसेक

भोजापूरमधून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातला पूर सध्या अत्युच्च पातळीवर आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. 

अतिवृष्टीचे चार बळी

अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात चार बळी घेतले आहेत. दिंडोरी तालुक्यात इंदोरे इथे घराची भिंत कोसळून कलाबाई गांगोडे ही महिला ठार झालीय.  तर दिंडोरी तालुक्यातल्या ओझे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची भिंत कोसळल्याने योगेश उघडे हा सोळा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. 

नाशिकमधील शाळा-महाविद्यालयांना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी सुटी जाहीर केलीय. मडकीजांबजवळ वाघाडचा कालवा फुटलाय. दिंडोरी गावात पाणी शिरलंय. लखमापूरजवळ मेळुस्के गावाच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने गावाचा संपर्क तुटलाय. कोलवण पुलावरून पाणी वाहत असल्याने दिंडोरी कळवण रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला. निफाड- सिन्नर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. निफाडमधील वीटभट्या गोदावरीच्या पूराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. नाशिकमधील गाडगे महाराज आणि रामवाडीपूल वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आलाय.  

नाशिक जिल्ह्यात सर्वच जलमय स्थिती आहे. पावसाने अत्युच्च पातळी गाठलीय. त्यामुळे कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय.