नागपूर : नागपूर सेंट्रल जेलच्या एकाहून एक सूरस कथा आता उजेडात येत आहेत. जेलमध्येच राहून कुख्यात राजा घौस गँग स्थानिक व्यावसायिकांकडून खंडणी उकळत होती, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
नागपूर जेलमधून पाच कैदी फरार झाल्यापासून हे जेल सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. जेलमध्ये कैद्यांकडं मोबाईल फोनपासून ते मादक अंमली पदार्थांचा साठा आढळल्यानं पोलिसही चक्रावून गेले. याच मोबाईल फोनच्या माध्यमातून राजा घौस गँग आपल्या बाहेरच्या पंटरच्या संपर्कात होती. जेलमध्ये बसूनच ही गँग व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावत होती.
नागपूरच्या सक्करदरा, वाडी, पाचपावली आणि जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे गुन्हे दाखल झालेत. पाच कैद्यांना तुरुंगातून पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अबरार खान या राजा घौसच्या गुंडाला अटक केली. त्याच्याच चौकशीत गँगची ही मोडस ऑपरेंडी उघड झाली, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश राऊत यांनी दिलीय. या तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पाच फरार कैद्यांच्या शोधासाठी जंग जंग पछाडणाऱ्या पोलिसांना अजून काहीही सुगावा लागलेला नाही. नागपूर पोलीस दलात आता मोठे फेरबदल झालेत. पोलिसांची नवी टीम तरी फरारी आरोपींचा लवकरात लवकर शोध लावू शकेल का, असा प्रश्न नागपूरकरांना पडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.