महाराष्ट्रात मुलगा-मुलगी एकसमान हे 'थोतांड' बंद करा...

महाराष्ट्रात २०१६ सालचं लिंग गुणोत्तर १००० मुलांमागे केवळ ८९९ मुली असा आहे... हे वाचून तुम्हाला जितका धक्का बसला असेल तितकीच ही राज्यासाठी शरमेचीही बाब आहे. 

Updated: Apr 15, 2017, 05:52 PM IST
महाराष्ट्रात मुलगा-मुलगी एकसमान हे 'थोतांड' बंद करा...  title=

मुंबई : महाराष्ट्रात २०१६ सालचं लिंग गुणोत्तर १००० मुलांमागे केवळ ८९९ मुली असा आहे... हे वाचून तुम्हाला जितका धक्का बसला असेल तितकीच ही राज्यासाठी शरमेचीही बाब आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या नागरी नोंदणी अहवालात ही गोष्ट ढळढळीतपणे समोर आलीय. उल्लेखनीय म्हणजे, याच अहवालात २०१५ साली महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर १०० मुलांमागे ९०७ मुली इतकं होतं... २०१६ साली या संख्येत तब्बल ८ टक्क्यांची घट होऊन ही मुलींची संख्या केवळ ८९९ पर्यंत घटलीय. २०११ साली हेच लिंग गुणोत्तर प्रमाण ८९४ एवढं नमूद करण्यात आलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, १००० मुलांमागे मुलींचे प्रमाण किमान ९६५ असणे आवश्यक मानलं जातं. त्याखालील प्रमाण चिंताजनक गोष्ट मानली जाते.

वाशिम-पुण्याची मान खाली...

वाशिम जिल्ह्यात ही परिस्थिती तर अत्यंत चिंताजनक आहेत. वाशिमध्ये तब्बल ६२ टक्क्यांची घट झाल्याचं लिंग गुणोत्तरातून स्पष्टपणे दिसून येतंय. वाशिम पाठोपाठ नंबर लागतो तो 'विद्येचं माहेरघर' आणि 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा... पुणे आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर ५३ टक्क्यांनी घसरलाय.

भंडाऱ्याकडून दिलासा...

एकंदर राज्यातील लिंग गुणोत्तर घटले असले तरीही भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जवळपास ७८ टक्क्यांनी वाढलाय. त्यानंतर परभणी आणि लातूरमध्येही मुलींचा जन्मदर वाढल्याचं दिसतंय.

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण काय करू शकतो?

मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या जागरूक नागरिकास २५ हजार रुपये रोख रक्कम बक्षिस देण्याची योजना राज्य शासनाकडून राबवण्यात येते. विशेष म्हणजे यासंबंधी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येतं. 

ज्या सोनाग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत आहे, अशी माहिती नागरिकांना मिळाल्यास ही माहिती जिल्हा रूग्णालय, जिल्हाधिकारी यांना कळवावी. १०४ आणि या टोल फ्री क्रमांकावरही माहिती देऊ शकता. त्याप्रमाणे आपली मुलगी संकेतस्थळावर ही माहिती दिल्यास त्याची तात्काळ दखल घेण्यात येईल.