नवी दिल्ली : अखेर, मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)मंजुरी मिळालीय. पीआयबीच्या बैठकीनंतर प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलीय. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांनी ही माहिती दिलीय.
पुण्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहला जाईल असं म्हणत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा नारळ फोडू, असं सूतोवाच गिरीश बापट यांनी केलंय.
पुणे मेट्रोचा तब्बल ५ किलोमीटरचा टप्पा हा भूमिगत असणार आहे. पहिला कॉरिडॉर चार वर्षांत आणि दुसरा पाच वर्षांत सुरू होईल.
दरवर्षी पुण्यात अपघातात ५०० लोकांचा मृत्यू होतो. पुणे मेट्रो हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. या प्रोजेक्टसाठी तब्बल १२ हजार कोटी रूपयांचा खर्च येणार असून यातील २० टक्के खर्च केंद्र सरकार तर २० टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. तर १० टक्के स्थानिक स्वराज्य संस्था आणि उरलेला ५० टक्के कर्ज असा हा खर्च वाटून केला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिलीय.
पुणे मेट्रोसाठी २ हजार ४३० कोटी महाराष्ट्र राज्य सरकार, पुणे मनपा १२७८ कोटी तर ६३२५ कोटींचं कर्ज घेण्यात येणार आहे. हे पैसे कमी पडल्यास आणखीन कर्ज वाढविले जाईल... यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर टेंडर काढले जाईल, असंही बापट यांनी स्पष्ट केलंय.
सर्व पक्षांना बरोबर घेऊन हा प्रस्ताव पुढे नेल्याचं ते म्हणतायत.