नागपूर : प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकरानं चक्क ५८ लाखांचा माल भरलेला ट्रक पळवल्याची घटना नागपूरात घडली. मात्र पोलिसांनी वेळीच सापळा रचला आणि फरार ट्रकड्रायव्हरसह एका आरोपीला अटक केली.
टीसीआय कंपनीत काम करणारा हा सुदर्शन मेश्राम. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरीत रहाणा-या सुदर्शनचं एका मुलीवर प्रेम जडलं. लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यानं एक प्लान आखला. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंक कंपनीच्या मालाचं नागपुरात वितरण करते. हा माल नागपूर विमानतळावर लोड केला जातो. सुदर्शननं हा माल चोरण्याचं ठरवलं..
यासाठी त्यानं भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ढाबा मालक कादिर यालाही सामील करुन घेतलं. मात्र निश्चित ठिकाणी ट्रक न पोहोचल्यानं कंपनीनं पोलीसांत तक्रार केली आणि पोलिसांनी मालासह दोन्ही आरोपींना भंडा-यातून अटक केली.
ट्रक मध्ये मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या इलेक्ट्रोनिक्स सामानासह लाखोंच्या इतर वस्तू होत्या. ट्रक मध्ये असलेला वस्तूंपैकी काही मोबाईल विकण्यात आरोपी सुदर्शन आणि कादिर यशस्वी झाले होते.
आरोपींना अटक केल्यावर प्रेयसीसाठी आपण ही चोरी केल्याचं सुदर्शननं कबूल केले. मात्र सुदर्शनच्या हेराफेरीमुळे अॅमेझॉनच्या ग्राहकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.