मुंबई : येत्या 48 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातल्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
गणपती विसर्जनावेळीही पावसानं राज्यभरात हजेरी लावली होती. मुंबई उपनगरात गुरूवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 39.93 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात 36.37 मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्येही पावसानं हजेरी लावली.
कोकण गोवा भागात 24 तासांत जोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. 19 सप्टेंबरला राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राय 17,18,19 ला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात येत्या 24 तासांत काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.