झी एक्सक्लुझिव्ह : कथा एका धैर्यकन्येची!

ही कथा आहे जिद्दीची... ही कथा आहे धैर्याची... बारावीत शिकणाऱ्या उज्ज्वला पाटोळे हिची...

Updated: Feb 24, 2015, 10:15 PM IST
झी एक्सक्लुझिव्ह : कथा एका धैर्यकन्येची! title=

हिंगोली : ही कथा आहे जिद्दीची... ही कथा आहे धैर्याची... बारावीत शिकणाऱ्या उज्ज्वला पाटोळे हिची...
  
सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे... हिंगोली जिल्ह्यातल्या सुरजखेडामधली उज्वला देवराम पाटोळे सध्या बारावीच्या परीक्षेला बसलीय. उज्ज्वला म्हणजे, वडिलांची लाडाची लेक, भावंडांमध्ये सर्वात हुशार... उज्ज्वलानं खूप शिकून कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावं हे तिच्या वडिलांचं स्वप्न... गरीबीतही उज्ज्वला शिक्षणासाठी जीवाचं रान करतेय... मन लावून अभ्यास करतेय. पण,... 

बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर...  आणि याच दिवशी उज्ज्वलाचं दुर्दैव आड आलं. बारावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच तिच्या वडिलांचं हृदयविकारानं निधन झालं. मात्र, तिनं धीरोदात्तपणं या प्रसंगाचा सामना केला. वडिलांना काळानं हिरावून नेलं असतानाही, तिनं परीक्षेचा पेपर दिला आणि आपल्या वडलांना खरीखुरी श्रद्धांजली वाहिली.

तिच्या या धीरोदात्तपणाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील खास पत्र पाठवून कौतुक केलंय. उज्ज्वलाचा निर्णय देशाला प्रेरणा देणारा असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी तोंडभरुन कौतुक केलं.

आई आणि बहिणीमुळेच आपल्याला वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मिळाल्याचं धैर्यकन्या उज्ज्वला सांगते. उज्ज्वलानं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल तर टाकलंय... आता, तिच्या या जिद्दीला गरज आहे योग्य दिशेची... उज्ज्वलाच्या पुढच्या वाटचालीसाठी झी २४ तासच्या शुभेच्छा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.