अरूण मेहेत्रे, पुणे : कुठल्याही प्रकारच्या विद्युत प्रवाहाशिवाय अंधाऱ्या झोपड्यांमध्ये प्रकाश पसरलाय. पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या 'दीपज्योत प्रकल्पा'ने ही किमया साधलीय. मंडळातर्फे जनता वसाहतीतल्या झोपड्यांमध्ये बसवण्यात आलेले 'बॉटल बल्ब' कुतूहलाचा विषय झालेत.
विज्ञानावर आधारीत असली तरी ही एक प्रकारची जादूच म्हणावी लागेल. एखाद्या ट्यूबलाईटचा प्रकाश पडावा तसा हा प्रकाश आहे. या प्रकारामुळे झोपड्यांमध्ये दिवसा होणारा अंधार दूर झालाय. आता विजेचा दिवा केवळ रात्रीच लावावा लागतो. आदर्श मित्र मंडळाने झोपड्यांमध्ये बसवलेल्या क्लोरीनयुक्त बॉटल बल्बने ही किमया साधलीय.
जपानमधला एक व्हिडीओ पाहून ही संकल्पना आकारास आली. हे अतिशय साधं तंत्रज्ञान आहे. पाण्याची अथवा कोल्ड ड्रिंकची बॉटल क्लोरीन तसंच ब्लिचिंगयुक्त पाण्याने भरायची. बॉटलचा एक चतुर्थांश भाग बाहेर आणि तीन चतुर्थांश भाग आत अशा पद्धतीने ती छतामध्ये बसवायचा की झाला बॉटल बल्ब...
विशेष म्हणजे, पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेला हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे, असं आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी म्हटलंय.
आपल्या सभोवतालच्या प्रश्नावर शोधलेलं हे अगदी साधं सोपं उत्तर. समस्याग्रस्तांसाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्यांसमोर आदर्श मित्र मंडळाने खरोखरच आदर्श ठेवलाय. महत्त्वाचं म्हणजे आपल्या समस्यांसाठी दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःच काही तरी करून दाखवण्याची मानसिकता कौतुकास्पद आहे.