सोलापूर : जैतापूर प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. आम्ही लोकांच्या बाजुने आहोत, असे सांगत शिवसेनेने कडाडून विरोध केलाय. मात्र, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणी कितीही विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जैतापूर प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प असून, तो पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्यच केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील सत्तेत भाजपसोबत सहभागी असलेल्या शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला विरोध आहे. त्यापार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले, जैतापूर प्रकल्प रद्द करण्यासारखी आता स्थिती नाही. चार वर्षांपूर्वी कोणी विरोध केला असता, तर त्याचा विचार करता आला असता, मात्र, आता हा प्रकल्प रद्द करता येणार नाही. कोणी किती विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण मंत्र्यांची पलटी
जैतापूर प्रकल्पाबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय. आमचा जैतापूर प्रकल्पाला विरोधच आहे. कोकणाचा कोळसा होऊ देणार नाही. वाटेल ती किंमत मोज़ावी लागले तरी चालेल पण जैतापूर प्रकल्प होऊ देणार नाही, असे स्पष्टीकर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची खेड येथे केले. त्याआधी त्यांनी म्हटले होते. जैतापूर प्रकल्पाला विरोध नाही. लोकांच्या बाजुने आम्ही आहोत, असे वक्तव्य केले होते.
विरोध कायम - सेना
जैतापूर प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना- भाजपमध्ये तिढा कायम आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असल्याचं अनिल देसाईंनी पत्रकार परिषदेत सांगितलं तर प्रकल्प पूर्ण होणारच असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय. तर जैतापूरच्या माझ्या वाक्याचा विपर्यास केल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय.
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प होणं किंवा न होणं, हा भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांसाठी आता प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.
रविवारी रात्री शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर प्रकल्पाच्या गेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जैतापूरला विरोध ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचं, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. तर शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या जैतापूर प्रकल्पातल्या घुसखोरीची गंभीर दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
कुठल्याही परिस्थितीत प्रकल्प होणारच असा ठाम दावा मुख्यमंत्र्यांनी केला. दरम्यान जैतापूर मुद्यावर आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असं सांगत, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घूमजाव केलं. एकंदरीत सत्तेतले हे दोन भागीदार पक्ष जैतापूर मुद्यावरुन, दिवसागणिक अधिक आक्रमक होत चालले आहेत. येणाऱ्या दिवसांत हा संघर्ष अधिक चिघळणार हे यावरुन स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.