जळगाव : स्वांतत्र्य दिनी अमळनेर शहराच्या प्रांत कार्यालयासमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. वेळीच पोलीस धावून आल्याने अनंत निकम हा इसम बचावला आहे. प्रांत कार्यालयासमोरील एका कमानीवर चढून या अनंत निकम या युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या युवक व्हिडीओत अंगावर रॉकेल ओतून घेताना दिसतोय. य़ावेळी ३ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. यातील एकाला धुळ्याला उपचारासाठी नेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
या घटनेची शहरात चर्चा होती, हा व्हिडीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल होत असताना, टेलव्हिजनवर ही बातमी का येत नाही?, असा सवाल नागरीकांकडून केला जात होता. याविषयी मीड़ियावरही आरोप होत होते.
यावेळी अनंत निकम हा इन्क्लाब झिंदाबाद, नगरपालिका भ्रष्ट प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत असताना व्हिडीओत दिसत आहे. अनंत निकम याने भ्रष्टाचारविरोधात आंदोलन केल्याने, त्याला तडीपारीसारख्या गुन्ह्याची नोटीस पोलीस प्रशासनाकडून दिली जात असल्याचा अनंत निकम याचा आरोप आहे.
प्रत्यदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत निकम, याच्यासोबत निता भांडारकर आणि शितल देशमुख यांनी देखील नगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अमळनेर नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर आली असताना प्रशासनाविरोधात आंदोलनं वाढली आहेत.
अनंत निकम याने यापूर्वी देखील अनेक आंदोलन केली आहेत, त्यावर विविध आरोपही झाले आहेत. गुन्हेही दाखल झाले आहेत, पण त्याच्यावरील गुन्हे गंभीर नसताना, त्याला तडीपारीसारखी कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने दाखवली असल्याचं चर्चा आहे.