जव्हारच्या आदिवासींनी साजरी केली पारंपरिक, पण कोरडी होळी!

होळीच्या सणात रंगाची उधळण करतांना पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. मात्र पालघरच्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळलाय. खरं तर आदिवासींसाठी होळी हा सर्वात मोठा सण मात्र त्यांनी कोरडी होळी साजरी करुन नवा आदर्श घालून दिलाय.

Updated: Mar 24, 2016, 08:31 AM IST
जव्हारच्या आदिवासींनी साजरी केली पारंपरिक, पण कोरडी होळी!  title=

कपिल राऊत, पालघर : होळीच्या सणात रंगाची उधळण करतांना पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. मात्र पालघरच्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळलाय. खरं तर आदिवासींसाठी होळी हा सर्वात मोठा सण मात्र त्यांनी कोरडी होळी साजरी करुन नवा आदर्श घालून दिलाय.

ही शेकडो वर्षांची  परंपरा आहे... त्यांनी आपलं लोकसंगीत आजही जपलं आहे... ते रितीरिवाज आजही पाळतात... आधुनिकतेलाही त्यांनी स्वीकारलंय.

पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील हा आदिवासींचा कुंजपाडा... सूर्यास्ताला जल पूजनाने आदिवासींच्या होळीला सुरुवात होते. पाण्याला ते आपलं जीवन मानतात... त्यामुळेच ही पूजा केली जाते. 

विहीर म्हणजे आदिवासींची जीवन वाहिनी... वर्षभर त्यांची तहान भागवण्याचं काम ही विहीर करते म्हणूनच त्यांच्या जीवनात विहीरीला महत्व आहे. जल पूजन होईपर्यंत सूर्य कधी मावळतीला गेला आणि कधी चंद्र प्रकाशानं आभाळ उजळून निघालं हे कळतंच नाही. त्याचवेळी बँडबाजाचं संगीत कानावर पडतं. 

इकडं आदिवासी पाड्यावर तरुणांनी होळीची सगळी तयारी करुन ठेवली. महिला, पुरुष, लहानथोर पाड्यावरची सगळी मंडळी होळी भोवती गोळी झाली. सर्वांनी मनोभावे होळीचं पूजन केलं आणि मग होळी पेटवण्यात आली.

आता होळीनं चांगलाच पेट घेतला होता. आगीच्या ज्वालांनी उजळून निघालेल्या परिसरात आदिवासींनी पारंपरिक तारपा नृत्याचा फेर धरला... इथं महिला-पुरुष असा कोणताच भेद नाही...  

आदिवासींच्या होळीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे होळीच्या सणाआधी विवाह झालेल्या नव दाम्पत्याला खांद्यावर उचलून त्यांची मिरवणूक काढली जाते. या उत्सवात लहान मुलेही मागे नसतात. त्यांच्यासाठी असते 'लिट पीट बोंबील बटाटे'ची खास मेजवाणी...

अशा प्रकारे हे आदिवासी बांधव रात्रभर होळी भोवती फेर धरुन पारंपरीक नृत्य करत होळी साजरी करतात. होळी हा आदिवासींचा सर्वात मोठा सण असतानाही यंदा राज्यात दुष्काळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोरडी होळी खेळण्याचा निर्णय स्वागतार्हच म्हणवा लागेल.