बेळगाव: सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. या भागातला मराठी फलक आज सकाळी पोलिसांनी काढला होता. आता त्यापाठोपाठ घरात घुसून मराठी भाषिकांना पोलिसांनी मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त हाती येतंय.
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी अभूतपूर्व अस्मितेचं दर्शन घडवत शनिवारी ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक उभा केला होता. बेळगाव जिल्हा प्रशासनानं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा फलक शुक्रवारी काढून टाकला होता; परंतु हा फलक 24 तासांच्या आत उभा करीत येळ्ळूरच्या ग्रामस्थांनी आपला ‘मराठी बाणा’ सिद्ध करून दाखविला. दरम्यान, पुन्हा एकदा हा फलक पोलिसांनी काढून टाकलाय.
लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी यांनी शुक्रवारी घेतलेली भूमिका पाहून जनतेनंच शुक्रवारी रात्री फलक उभारण्याचा प्रयत्न केला; पण पोलीस बंदोबस्त असल्यामुळं तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. रात्री पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्या वेळी पोलिसांनीही दगडफेक केली.
यानंतर येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी पुन्हा फलक उभारण्याचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. फलक उभारणीचे काम पूर्ण होताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, येळ्ळूर इथं फलक हटविण्याच्या निषेधार्थ सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.