कोल्हापूर : कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. सकाळी 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. पण बिबट्याला जंगलात सोडायला जात असताना बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला.
कोल्हापूरत खासदार धनंजय महाडिक यांच्या घराच्या परिसरात बिबट्या शिरला होता. पहाटे पाचच्या सुमाराला हा बिबट्या परिसरात दिसल्यानं एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. पाच तासात बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आलं. वनविभागाचे अधिकारी मात्र फार उशिरा घटनास्थळी आले आणि वरून ते केवळ बघ्याच्या भुमिकेत होते की काय असा प्रश्न या घटनेनंतर निर्माण झालाय. ज्या पद्धतीनं या बिबट्याला पकडलं, ज्या प्रकारे त्याला गाडीत चढवलं ते पाहता या लोकांना म्हणावं तरी काय असं वाटतय...
चुकीच्या पद्धतीनं या बिबट्याला जाळ्यात पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला गाडीत चढवताना अतिशय वाईट पद्धतीनं हाताळण्यात आलं.पण हे सगळं घडलं कारण स्थानिकांनी त्यांच्या त-हेने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले. कारण नेहमीप्रमाणे वनविभागाचे अधिकारी फार उशिरा घटनास्थळी पोहोचले. बिबटे मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना आता नवीन राहिलेल्या नाहीत. मग अशा परिस्थितीत वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी योग्य यंत्रणा नसणं, त्याला बेशुद्ध करण्यासाठी साहित्य नसणं ही वनविभागाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
बिबट्याला पाहुन स्थानिकांमध्ये उडालेली गडबड आणि येवढा मोठा जमाव पाहुन बिथरलेला बिबट्या, यामुळे या बिबट्यानं दोन तीन जणांवर हल्लाही केला. हा सगळा प्रकार निश्चितच प्राणीमित्रांमध्ये चिड निर्माण करणारा आहे. प्राणीमित्रच नाही तर जाळ्यातल्या बिबट्याला हाताळणं पाहिलंत तर तुमच्या मनातही चिड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.