चेतन कोळस, येवला : आजपर्यंत जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरे बसवण्यात येतात, अशा बातम्या आपण पाहिल्या-ऐकल्या असतील. मात्र, आता या प्राण्यांपासून बचावासाठी चक्क मुलांनाच पिंजऱ्ययात ठेवण्यात येत आहे. हा एक रिपोर्ट.
निफाड तालुक्यात बिबट्याचा संचार आणि हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ले होत असतानाच आता चिमुकल्यांवरही बिबटे हल्ले करत आहेत. मंगळवारी शिंगवे गावात अंगणात खेळणार्या साडेचार वर्षीय दीपावली कोठे या मुलीवर बिबट्याने हल्ला चढविला. रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
बिबट्याच्या दहशतीचा विचार करता काहींनी लहानग्यांसाठी अंगणात लोखंडी जाळीचा वापर करुन तटबंदी तयार करुन त्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली आहे. करंजगावच्या भेडाळी रस्त्यारील नीलेश पावसे यांनी शेतात भाचा सुदर्शन यांच्यासाठी लोखंडी जाळी अणि पत्र्याच्या मदतीने ८ बाय १४ चौरस फुट आकाराची सुरक्षित जागा तयार करवून घेतली. या ठिकाणी सुदर्शन थांबतो व खेळतो. त्याच्याकडे आजी जिजाबाई, आई जयश्री लक्ष ठेवतात.
बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतीसाठी बाहेरगावाहून येणार्या मजुराची संख्या कमी होत आहे. परिणामी दैनंदिन शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गस्त वाढविली असून पाच पिंजरे लावले आहेत. मात्र अद्याप बिबट्या जाळ्यात सापडलेला नाही. बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही म्हणून आता मुलांसाठी पिंजरे बांधण्याची वेळ नागरिकांवर आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.