नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रसुती रजा!

महाराष्ट्र शासनानं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. आता, नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसुती रजा देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. 

Updated: Sep 30, 2015, 11:03 AM IST
नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रसुती रजा! title=

मुंबई : महाराष्ट्र शासनानं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. आता, नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसुती रजा देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. 
   
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील एका प्रचलित नियमानुसार दोन वर्ष किंवा अधिक सेवा झालेल्या महिला कर्मचारीच 180 दिवसांपर्यतच्या पूर्ण वेतनी प्रसुती रजा घेण्यास पात्र होत्या. एका वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना अर्धवेतनीय प्रसूती रजा मिळते. मात्र, एका वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना मात्र या नियमानुसार प्रसुती रजा मिळत नाही. त्यामुळे शासन सेवेत नव्याने प्रविष्ठ झालेल्या मात्र प्रसुतीच्या कारणास्तव रजेची आवश्यकता असणाऱ्या महिला कर्मचारी प्रसुती रजेपासून वंचित होत्या.    
           
वास्तविक मातृत्व हा स्त्रीचा नैसर्गिक अधिकार व हक्क आहे. यामुळे प्रचलित नियमातील किमान दोन वर्षाच्या सेवेची अट रद्द करून नव्यानेच शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही रुजू झाल्यानंतर तात्काळ प्रसुती रजेस पात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नव्याने सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.