मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या फोनवर अनेकवेळा फोन केल्याचा धक्कादायक आरोप आपच्या प्रिती मेनन यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.
दाऊदनं एकनाथ खडसेंच्या नावावर रजिस्टर असलेल्या नंबरवर अनेकदा फोन केल्याचं वडोदऱ्याचा हॅकर मनीष भांगळेनं सांगितलं आहे. इंडिया टू़डे या इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी प्रसिद्ध केली होती, त्यानंतर हा वाद सुरु झाला. भांगळेनं दाऊदीची बायको मेहजबीन शेखच्या नावावर असलेले चार फोन हॅक केले होते.
एकनाथ खडसे यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आहे. मी आणि माझ्या कुटुंबातल्या कोणाचंही कधीही दाऊदबरोबर बोलणं झालेलं नसल्याचं स्पष्टीकरण खडसेंनी दिलं आहे. तसंच हा फोन वर्षभरापासून बंद असल्याची प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.
दाऊदबाबतच्या या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपनं एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.