दोन वर्षानंतर... माळीणच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर!

३० जुलै २०१४... माळीण गावावर डोंगरकडा कोसळला आणि अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं. आज या घटनेला बरोबर दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दोन वर्षांनंतर कसं आहे माळीण गाव... पुनर्वसनाची स्थिती काय आहे? पाहुयात एका ग्राऊंड रिपोर्ट...  

Updated: Jul 30, 2016, 01:27 PM IST
दोन वर्षानंतर... माळीणच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर! title=

साईदिप ढोबळे, पुणे : ३० जुलै २०१४... माळीण गावावर डोंगरकडा कोसळला आणि अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं. आज या घटनेला बरोबर दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दोन वर्षांनंतर कसं आहे माळीण गाव... पुनर्वसनाची स्थिती काय आहे? पाहुयात एका ग्राऊंड रिपोर्ट...  

क्षणात होत्याचं नव्हतं झालं... 

भीमाशंकरच्या कुशीत नांदत होतं एक गाव... चिल्ल्यापिल्ल्यांचा तो आवाज... जनावरांचं हंबरणं... अचानक निसर्ग कोपला आणि उरल्या त्या फक्त आठवणी... ३० जुलै २०१४ पर्यंत माळीणमध्ये सारं काही आलबेल सुरू होतं. ग्रामस्थ सुखासमाधानानं जगत होते. पण नियतीला ते मान्य नव्हतं... पहाटेच्या वेळी गावावर डोंगरकडा कोसळला आणि माळीण गाव दरडीखाली गाडलं गेलं... एक दोन नव्हे तर तब्बल १५२ निष्पाप ग्रामस्थांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला... ना घरं राहिली ना जनावरं... कुठं आई-बापाची ताटातूट तर कुठं मुलांचा विरह... आजही ते दृष्य त्यांच्या नजरेसमोरून जात नाही... त्या घटनेनं माळीणकरांच्या डोळ्यात पाणी येतं... 

दोन वर्ष झाली पण माळीणवासियांच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही... हिवाळा असो की पावसाळा... अशा तात्पुरत्या शेडमध्ये राहत माळीणवासीय दिवस काढतायत... दोन वर्षांत राहण्यासाठी पक्की घरंही उभारण्यात आलेली नाहीत. माळीणवासियांना सरकारनं दिलेली सारी आश्वासनं हवेतच विरल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिलीय.

'आल्युफॉन'चा वापर पण... 

माळीणजवळच्या आमडे गावात आठ एकर जागा विकत घेऊन कायमस्वरूपी पुनर्वसनाचं काम सुरू आहे. पण मुदतीचा कार्यकाळ कधीच निघून गेलाय... घराच्या बांधकामात 'आल्युफॉन' या आधुनिक तंत्राचा वापर होत असला तरी कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. वर्षभरापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण झालं. पण आताच त्याची बिकट अवस्था झालीय. 

माळीणची दुर्घटना घडली त्यावेळी शिल्लक राहिली ती फक्त शाळेची इमारत... या दुर्घटनेत जी मुलं वाचली ती सध्या तात्पुरत्या खोल्यांमध्ये शिक्षण घेतायत... शाळेची इमारत चांगल्या अवस्थेत असली तरी ही जागा मात्र धोकादायक आहे.

धोकादायक स्थिती कायम

माळीणची घटना घडली... त्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले... पण यातून आपण काही शिकलो का? तर याचं उत्तर दुर्देवानं नाही असंच आहे... कारण माळीणच्या आजूबाजूची गावं धोकादायक स्थितीत आहेत... त्यामुळे सरकारनं वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे.