मालवण: मालवणजवळचं एक गाव चक्क तीन दिवस ओस पडतं... दर ३ वर्षांनी गाव पडतं.
मालवणजवळच्या आचरा गावात दर तीन वर्षांनी ही गाव परंपरा पाळली जाते. तिला म्हणतात गावपळण.... दर तीन वर्षांनी गावकरी तीन दिवसांसाठी घरं दारं बंद करून, गुराढोरांसह गावाबाहेर पडतात.
ग्रामदेवतेच्या मंदिरातून हा आदेश निघतो. गाव सोडण्याच्या तारखा मंदिरातून निश्चित केल्या जातात. यंदा ७ ते ९ डिसेंबर असा गावपळणाचा कार्यक्रम जाहीर झालाय. त्यामुळं ग्रामस्थ ३ दिवस पुरेल इतकं धान्य, कपडे, गरजेच्या वस्तू घेऊन गाव सोडून गेलेत. अडाणी माणसापासून सुशिक्षित वर्गापर्यंत सगळेजण ही परंपरा पाळत असल्याचं दिसून येतं. या प्रथेमुळे ३ दिवस गावातले व्यवहार पूर्णपणे ठप्प होतात. गावातल्या बँका, सरकारी कार्यालयं, दुकानं अगदी शाळाही या काळात बंद असतात. त्यामुळं शाळा गावाबाहेरच भरते.
गावपळणकडे पाहण्याचा इथल्या ग्रामस्थांचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ मंडळीपेक्षा खूपच वेगळा आहे. त्यामुळंच जेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव आणि त्यांचे कार्यकर्ते या काळात आचरा गावात राहण्यासाठी आले तेव्हा ग्रामस्थांशी त्यांचा चांगलाच संघर्ष झाला. समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.
ही शेकडो वर्षांची परंपरा असल्यानं आमच्या धार्मिक भावना दुखवू नयेत अशी विनंती ग्रामस्थांनी श्याम मानवांना केली. मात्र त्याला न जुमानता श्याम मानवांनी या प्रथेला आव्हान दिलं आणि ते यशस्वी झाल्याचा दावाही केला.
शेकडो वर्षांपूर्वी कोकणातल्या आचरा गावात ही परंपरा नेमकी कुठल्या कारणासाठी सुरू झाली यासंदर्भात काहीच माहिती नाही. पण ३ वर्षांतून एकदा अख्ख्या गावाला निसर्गाच्या सानिध्यात एकत्र आणणं. त्यानिमित्तानं गावातली घरांची होणारी झाडलोट आणि गावाबाहेर राहताना निर्माण होणारी एकोप्याची भावना असेही उद्देश या गावपळणीच्या मागे असल्याचं सांगितलं जातं. मात्र विज्ञाननिष्ठ जगात त्याकडं एक अंधश्रद्धा म्हणूनच पाहिलं जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.