अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या आशिर्वाद नगर भागात कटलेल्या पतंग गोळा करण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली.
चंद्रशेखर वडतकर असं हत्या झालेल्याचं नाव आहे. चंद्रशेखरचा मित्र सागरला गंभीर जखमी कऱण्यात आलं. मारेकरी 17 ते 20 वयोगटातले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग गोळा करण्याच्या वादातून एकाला आपला जीव गमवावा लागलाय. नागपूरच्या आशीर्वाद नगरच्या मैदानात शरद वडतकर आपल्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. त्यावेळी कटलेली पतंग गोळा करण्यावरून त्याचा दुस-या एका गटाशी वाद झाला.
वाद निवळल्यावर तासाभरानंतर आठ ते दहा युवक परत आले आणि त्यांनी चंद्रशेखर आणि त्याचा मित्र सागर यांना बेदम मारहाण केली. चाकू आणि खंजीरीचे वारही करण्यात आले. यात चंद्रशेखरने तिथून पळ काढला. पण मारेक-यांनी त्याचा पाठलाग करून त्याला मारहाण केली.
या मारहाणीत त्याचा जीव गेला. चंद्रशेखरचं दीड वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तो मिहान कंपनीत कामाला होता. मारेकरी 17 ते 20 वयोगटातेल आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
क्षुल्लक कारणांवरून हाणामा-या, हत्या होण्याचे प्रकार वाढलेत. पतंग गोळा करण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून हत्या होत असतील तर प्रत्येकानेच गांभीर्यानेच विचार करण्याची वेळ आलीय.