पिंपरी : पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये दोन विरोधी नेत्यांमध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळालाय. सध्या भोसरीतले अपक्ष आमदार महेश लांडगे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलाय.
राज्यात पिंपरी चिंचवड शहर राजकीय वादांमुळे नेहमचीच चर्चेत राहिलंय. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाल्यानं संघर्ष होणार हे उघड होतं. त्यातच अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीसह खासदारांच्याही मतदारसंघात पुढचा खासदार महेश दादा अशी बॅनरबाजी केली होती. त्यानंतर कामाच्या श्रेयावरून दोघांमध्ये संघर्ष पेटला. तर शिवसेना उपनेते अमोल कोल्हे यांनी, लांडगे हे अपघातानं आमदार झाल्याची टीका केली.
तसंच खासदार आढळराव पाटील यांनी कुणालाही खासदारकीची स्वप्नं पडत असल्याचा टोला लांडगे यांना लगावला. तर कोणत्याही नेत्याच्या कार्यकर्त्यांना आपला नेता मोठा व्हावा असंच वाटत असल्याची सावध प्रतिक्रिया महेश लांडगे यांनी दिलीय. महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे यांना दिलेल्या धमकीवजा इशा-यावरही आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केलीय.
दरम्यान, महेश लांडगे यांनी आपण अमोल कोल्हे यांचा आदर करतो, अस सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. मात्र शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही दादांमधला संघर्ष यापुढेही वाढतच जाण्याची चिन्हं आहेत.