नाशिक : शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून शेतकरीच या निवडणुकांत निर्णायक भूमिका वठविणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या 6 नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात.
- यात भगूरच्या १७ जागांसाठी मतदान होत असून नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे
- सिन्नरमध्ये २८ जागा आहेत आणि तिथं अनुसूचित जमातीसाठी नगराध्यक्षपदाचं आरक्षण आहे
- सटाण्यात २१ आणि येवल्यात २४ जागांसाठी मतदान होईल आणि या दोन्ही नगरपालिकांची नगराध्यक्षपदं खुली आहेत
- नांदगावमध्ये १७ जागा असून तिथं ओबीसी आरक्षण आहे
- तर मनमाडच्या ३१ जागांसाठी मतदान होणार असून तिथं सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष असेल.
यात पंकज भुजबळांचं कार्यक्षेत्र असलेल्या मनमाडच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा असतील. मनमाडमध्ये भुजबळांचा वरचष्मा असला तरी सध्या तिथं शिवसेनेचा नगरसेवक आहे. आरक्षणामुळे युती झाली तर नगराध्यक्षपद युतीकडे जाऊ शकतं. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं इनकमिंग केल्यामुळे शिवसेनेची ताकदही वाढलीये. युती झाली नाही तर शिवसेना अव्वल, काँग्रेस दुसऱ्या, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाऊ शकतो. सिन्नरमध्ये मात्र भाजप-सेनेच्याच उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. सटाणा पालिकेत नगराध्यक्षपद सध्या राष्ट्रवादीकडे आहे. परंतु, सध्याच्या सर्वसाधारण आरक्षणामुळे ते अपक्षांकडे जाण्याची शक्यता बळावली आहे. राज्याच्या पातळीवर युतीचा निर्णय झाला असला तरी जिल्ह्यात तशी शक्यता कमी असल्याचं दिसतंय.
थेट निवड पद्धती आणि आरक्षण यामुळे अनेक ठिकाणी सत्ताबदलाचे संकेत आहेत. मनमाड, सटाणा, येवला इथं बदलाचे वारे जास्त तेज आहेत. ग्रामीण भागात शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. जिल्हा बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने शेती अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. जिल्ह्यात वर्षभरात 75 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झाल्यात. अशा वेळी बळीराजाची मतं निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आघाडीला अनुकूल असल्याचे आडाखे बांधले जातायत. आघाडीसाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आल्यानं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गणितं असतील.
ग्रामीण भागातला राष्ट्रवादीचा हुकमी एक्का, छगन भुजबळ सध्या गजाआड आहेत. असं असलं तरी त्या पक्षाला द शो मस्ट गो ऑन असं म्हणत कामाला लागावं लागणार आहे. हवा युतीची असली तरी शिवसेनाच वरचढ ठरण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यापुरता तरी मोठा भाऊ कोण, हा प्रश्न सुटलाय.