कोल्हापूर : अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, नाना पाटेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

नाना पाटेकर एका कोल्हापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते.

राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावली

सर्वच पक्षांतील राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनला सामान्य माणूसही आर्थिक मदत करत आहे. नाना यांनी आपल्या ‘खास शैली’त राजकारण्यांचा समाचार घेत त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.

कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे

शेतकऱ्यांविषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, आपल्या आई-वडिलांच्या आजारपणातील औषधोपचाराचा खर्च तो करू शकत नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याला अपयश येते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे.

बळीराजाला एकाकी, निराश

आई, वडील, दोन लेकरांना मागे सोडून तो गळफास घेतो. बळीराजाला एकाकी वाटत आहे. तो निराश झाला आहे. पेन, पाण्याची बाटली अशा सर्वच वस्तूंचे दर ठरलेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव निश्चित नाही. परिणामी, तो आर्थिक अडचणीत येत आहे. 

शरद पवार आणि बाळासाहेब

शरद पवार माझे जवळचे मित्र आहेत. बाळासाहेब ठाकरे वडिलांच्या स्थानी आहेत. मात्र, मी कधी हात पसरला नाही. हात पसरले की किमतीचे लेबल लागते अन् मैत्री संपते, असे त्यांनी सांगितले. 

ऊर्जा निर्माण करण्याचे काम

अनेक संघर्ष करत मी येथे पोहोचलो आहे. अनेकवेळा फूटपाथवर झोपलोही. १०-१५ रुपयांत दिवस काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता अडचणींना सामोरे जावे. आत्महत्या करणे हे षंडपणाचे लक्षण आहे. म्हणून अडचणीतील शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम नाम फाउंडेशन करीत असल्याचं नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितलं.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
nana patekar on pay commission and farmers
News Source: 
Home Title: 

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?
Yes
No