विकास भदाणे, जळगाव : आता शौर्य गाथा एका शूरवीर मुलीची... तिनं आपल्या जीवाची पर्वा न करता आगीत स्वत:ला झोकून देत एका चिमुरडीचे प्राण वाचवलेत... जळगावातल्या भडगावच्या निशा पाटील या विद्यार्थिनीची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय.
भडगाव इथल्या याच आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी निशा दिलीप पाटील हिची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारसाठी निवड करण्यात आलीय. निवडीचं पत्र शाळेला प्राप्त होताच विद्यार्थिनींनी जल्लोष केला.
यशवंतनगर भागातील गरीब कुटुंबात राहणारी निशा पाटील ही ११ वी वाणिज्य वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. १४ जानेवारीला अभ्यासाची वही मैत्रिणीकडून घेऊन घरी येताना शेजारच्या घरातून आगीचा धूर निघताना तिला दिसला. घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेले होते...
अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला त्याची आई बाळाला झोळीत निजवून बाहेर गेली होती... घराचा दरवाजा उघडून बघितला तर लहान बाळाच्या झोक्याच्या दोरीला आग लागल्यामुळे ते बाळ जमिनीवर पडलेले होते... लाकडी, धाब्याचे घर असल्याने ते जळत होते... क्षणाचाही विलंब न करता निशाने घरात जावुन बाळाला बाहेर काढले. लगेचच धाब्याचे छत खाली कोसळले. निशाने दाखविलेल्या धाडसाची दखल घेत निशाची बाल शौर्य पुरस्कारसाठी निवड करण्यात आलीय.
निशाने दाखवलेले शौर्य हे शाळेच्या दृष्टीने मानाची बाब आहे. तिच्या या धाडसाचे कौतुक राष्ट्रीय पुरस्काराने झाल्याने शाळेच्या व्यवस्थापनाने निशा पाटीलचे यश हे शाळेचा सन्मान असल्याचे म्हटलंय. निशाचे कार्य सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलंय.
महाराष्ट्र राज्यातून एकमेव शौर्य पुरस्कार निशा पाटीलला जाहीर झालाय. या पुरस्काराचे २६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वितरण होणार आहे.