नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका, काँग्रेस नाराज

जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून आघाडीत ठिणगी पडली आहे- राष्ट्रवादीनं काँग्रेसला धोबीपछाड देत दोन्ही जागा काबीज केल्याने काँग्रेस नाराज आहे.

Updated: Sep 23, 2014, 08:51 AM IST
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका, काँग्रेस नाराज title=

नाशिक : जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून आघाडीत ठिणगी पडली आहे- राष्ट्रवादीनं काँग्रेसला धोबीपछाड देत दोन्ही जागा काबीज केल्याने काँग्रेस नाराज आहे.

आघाडी धर्म न पाळल्याने विधानसभेत आम्हीही जागा दाखवून देऊ असे सांगत दोघामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्यात. नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांची आघाडी होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असल्याने आघाडीचे निर्विवाद वर्चस्व होते. 

अध्यक्ष पदासाठी चार नावं चर्चेत होती त्यापैकी विजयश्री चुंबळे, मंदाकिनी बनकर आणि किरण थोरे यांच्यात स्पर्धा  होती. मात्र अखेरच्या क्षणी भुजबळांनी चुंबळे यांच्या पारड्यात वजन टाकलं. इतकंच नाही तर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे संदीप गुळवे यांना माघार घेण्यास भाग पाडत राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील यांना विजयी करून दिलं. त्यामुळे काँग्रेसचा संताप झाला असून विधानसभेत दाखवू अशी भाषा आता सुरु झाली. 

भुजबळांनी सत्ता खेचू आणली असली तरी यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसच्या नाराजीला तोंड द्यावं लागलंय. शिवाय दिलीप बनकर, पंढरीनाथ थोरे अशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही नाराजी ओढवून घ्यावी लागली. बनकरांनी तर थेट पवारांच्या दारात तक्रार केलीये. राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे काँग्रेस इतकी नाराज झालीये की आघाडीबाबत आम्ही विचार करत अल्याचं स्थानिक पदाधीका-यांचं म्हणणं आहे.

युतीत फूट आणि आघाडीत सुंदोपसुंदी अशी परिस्थिती नाशिकमध्ये सध्या दिसून येते आहे. राज्यात अजून निर्णय झालेला नसताना या प्रकाराने काँग्रेस अधिकच संतप्त होणार आहे. त्यामुळे विधानसभेचा राजकीय आखाडा आघाडीतही चांगलाच रंगणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.