पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावले, आता नेतृत्व करू शकत नाही : भास्कर जाधव

राष्ट्रवादीचे नाराज नेते भास्कर जाधव यांची पक्षावर तोफ डागली आहे.  

Updated: Oct 27, 2016, 02:00 PM IST
पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावले, आता नेतृत्व करू शकत नाही : भास्कर जाधव title=

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे नाराज नेते भास्कर जाधव यांची पक्षावर तोफ डागली आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय, मी आणखी किती दिवस अन्याय सहन करणार! मी आता जिल्ह्याचे नेतृत्व करू शकत नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी पक्ष सोडण्याचे एकप्रकारे संकेत दिलेत. दरम्यान, त्यांना आज आपले शक्तीप्रदर्शन केल्याचे  बोलले जात आहे.

आज चिपळूण शहरात कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रवादीवरच निशाणा साधला. माझ्या कार्यकर्त्यांना पद दिली जात नाहीत, त्यांचा अन्याय असह्य झाला आहे. मी माझ्या लोकांना, कार्यकर्त्या सोडून कुठे ही जाणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांवरचा अन्याय मी आणखी किती सहन करू, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच पक्षाच्या जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत, प्रदेश पातळीवर विश्वासात घेतले जात नसल्याची खंतही जाधव यांनी व्यक्त केली. हे वारंवार होत असल्याने कार्यकर्त्यांचे खच्चिकरण होत आहे. यामुळेच मी शांत बसलो आहे. 12 वर्षात माझा एकही कार्यकर्त्या साधा पक्षाच्या कार्यकारणी वर घेतला नाही, असा हल्लाबोल जाधव यांनी केला. 

जाधव यांनी नाव न घेता प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाराज जाधव यांनी मला कोणतेही पद नको असे म्हटले आहे. तर कार्यकर्ते मला सांगत आहेत, तु्म्ही प्रदेशचे अध्यक्ष व्हा, असे जाधव यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, भास्कर जाधव यांचे जिल्ह्याभरातील समर्थक आणि पाठिराखे चिपळुणात दाखल झालेत. त्यामुळे भास्कर जाधव काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जाधव यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जाधव भाजपमध्ये दिवाळीनंतर जातील, अशीही कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, काल जाधव यांचे कार्यकर्ते ते नाराज असले तरी पक्ष सोडणार नाही असे सांगत आहेत.