नीलेश नारायण राणे यांची काँग्रेस पदाधिकाऱ्याला जबर मारहाण

 नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप,  काँग्रेस पदाधिका-याने केला आहे. 

Updated: Apr 26, 2016, 08:22 AM IST
नीलेश नारायण राणे यांची काँग्रेस पदाधिकाऱ्याला जबर मारहाण title=

ठाणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप, रत्नागिरीतल्या काँग्रेस पदाधिका-याने केला आहे. 

मराठा आरक्षण मेळावा

रविवारी चिपळूण इथे मराठा आरक्षणासंबंधी मेळावा घेतला गेला. त्या मेळाव्याला उपस्थित राहिलो नाही म्हणून नीलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप, काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांनी केलाय.

गाडीत कोंबून मारहाण

आईची तब्येत बरी नसल्यामुळे संदीप सावंत मेळाव्याकरता जाऊ शकले नव्हते. त्यानंतर समर्थकांसोबत घरी आलेल्या नीलेश राणे यांनी आपल्या थोबाडीत मारली. त्यानंतर गाडीत कोंबून मारहाण करतच मुंबईला आणल्याचा आरोप, संदीप सावंत यांनी केलाय. 

जबर मारहाण झाल्याच्या खूणा

मुंबईतही एका खोलीत कोंडून ठेऊन मारण्यात आल्याचं सावंत यांनी सांगितलंय. त्यांच्या अंगावर जबर मारहाण झाल्याच्या खूणा आहेत. तसंच डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. घडल्या प्रकारानं प्रचंड धास्तावलेले सावंत मुंबईतल्या रुग्णालयाऐवजी ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत.