बीड : शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेश असावा की असू नये, या वादावर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, हनुमानला महिला आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी महिलांना प्रवेश नाकारण्याचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे.
पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले, शनी देवाला काय आवडत होते ते मला माहित नाही. मात्र, कोणीही शनिशिंगणापूरमध्ये मंदिरात महिलेने केलेल्या प्रवेशावर टीका-टिपण्णी करु नये. तसेच कोणाचेही कौतुक करु नये, अशी प्रतिक्रिया मीडियाशी बोलताना पंकजा यांनी व्यक्त केली.
दरम्यान, 'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना चौथऱ्यावर प्रवेश बंदी असेल, तर तो त्यांचा अपमान कसा ठरतो? असा धक्कादायक प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर प्रथा-परंपरा पाळल्याच गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी म्हटलंय.
मारूतीच्या मंदिरातही महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कोणत्याही महिलेने अपमान वाटून घेण्याचे कारण नाही. समाजात मुलींना जन्मालाच येऊ न देणे, त्यांना शिक्षणाची संधी न देणे, नोकरीमध्ये त्यांना डावलणे हा त्यांचा अपमान आहे, असे मी मानते, असे वृत्तात म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.