मंत्रिपद गेल्यानंतरही... पतंगराव लाल दिव्यातच!

मंत्री पद गेलं, तरीही लाल दिव्याचा सोस काही जाईना. ही अवस्था आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची. सत्ता गेली तरी पतंगराव आजही लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत... तेही नियम डावलून आणि बिनदिक्कत… 

Updated: Mar 4, 2016, 12:11 PM IST
मंत्रिपद गेल्यानंतरही... पतंगराव लाल दिव्यातच! title=

पुणे : मंत्री पद गेलं, तरीही लाल दिव्याचा सोस काही जाईना. ही अवस्था आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची. सत्ता गेली तरी पतंगराव आजही लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत... तेही नियम डावलून आणि बिनदिक्कत… 

लाल दिवा असलेली ही आलिशान गाडी… गाडीचा नंबर एमएच - १४ सीडब्ल्यू ९००… लाल दिव्याच्या या गाडीत पतंगराव कदम बसलेले आढळले. पुण्यात काँग्रेसच्या कार्यक्रमाला पतंगराव याच लाल दिव्याच्या गाडीतून आले आणि गेले... पतंगराव कदम सध्या मंत्री नाहीत किंवा मंत्रीपदाचा दर्जा असलेलं कोणतंही घटनात्मक पद त्यांच्याकडं नाही... मग ते लाल दिव्याची गाडी अशी राजरोस कशी वापरू शकतात? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. 

बेकायदेशीर लाल दिवा... 

कोणत्या पदावरील व्यक्ती लाल दिव्याची गाडी वापरू शकते, या संधर्भात आरटीओचं नोटीफ़िकेशन आहे. या नोटीफ़िकेशन मधील कोणतंच पद पतंगराव कदम यांच्याकडे नाही. म्हणजेच, या नोटीफ़िकेशननुसार, आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पतंगराव कदम गाडीवर करत असलेला लाल दिव्याचा वापर बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होतंय.

पतंगरावांची बोलती बंद

पतंगराव कदम लाल दिव्याची ही एकच गाडी वापरात नाहीत… तर एमएच १० बीएम ९९९ या क्रमांकाच्या गाडीवरदेखील लाल दिवा आहे. पुण्यातील भारती विद्यापीठाच्या दारात ही गाडी अनेकदा उभी असते… याबाबत आम्ही पतंगरावांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. २००१ मधील एक शासन आदेश त्यांनी दाखवला.

काय आहे या 'शासन' आदेशात... 

या आदेशानुसार, कदम भारती विद्यापीठाचे कुलपती असेपर्यंत त्यांना गाडीवर लाल दिवा वापरण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं म्हटलंय... कुलपती पदावर असेपर्यंत मुंबई आणि राज्यात त्यांना पोलीस एस्कोर्ट पुरवण्यात यावं, असंदेखील या आदेशात म्हटलंय.

मात्र, या आदेशाची प्रत कदम यांनी दिली नाही. काही दिवसात या पत्राची प्रत उपलब्ध करून देऊ असं त्यांनी सांगितलं. पण त्यांच्याकडून टाळाटाळ केली जातेय.

कारवाई का नाही?

आरटीओच्या नियमाप्रमाणे पतंगराव कदमांच्या गाडीवरील लाल दिवा बेकायदेशीर आहे. पण तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही.

कायदे सामान्यांसाठीच?

वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं म्हणून, सामान्य माणसावर कारवाई करताना वाहतूक पोलीस आणि आरटीओ नेहमीच दिसतात. पण कायद्याचं एवढं उघड उल्लंघन होऊनही पतंगराव कदम यांच्यावर कारवाई करायला वाहतूक पोलीस आणि आरटीओ का धजावत नाही? असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळं कायदे आणि नियम फक्त सामान्य माणसासाठीच असतात, हे पुन्हा एकदा सिध्द झालंय.