पिंपरी: मृत्यूशी झूंज देणाऱ्या पुण्यातल्या अल्पवयीन मुलीचा अखेर मृत्यू झालाय. सततच्या छेडछाडीला कंटाळून तिनं आत्महत्या केली होती.
पिंपरीमधल्या भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, ३१ डिसेंबरच्या रात्री, या १५ वर्षांच्या मुलीची ३ तरुणांनी छेड काढली होती. त्यानंतर दोन जानेवारीलाही हाच प्रकार घडला होता. त्यामुळं खचलेल्या या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र १७ दिवसांच्या उपचारांनंतर रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भोसरी पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली. ३१ डिसेंबरच्या घटनेनंतरच तक्रार करुनही पोलिसांनी वेळीच पाऊलं उचललं नाहीत. त्यामुळं दोन जानेवारीला या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केलीय. त्यामुळं टवाळखोर तरुण आणि भोसरी पोलिसांची उदासिनता, यांनीच तिचा बळी घेतल्याचा आरोप तिचे नातेवाईक करताहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.