पुणे : पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले असतानाच आता दुस-या टप्प्यातील म्हणजेच शिवाजीनगर – हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्पालाही हिरवा कंदील मिळाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीच्या (पीएमआरडीए) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर –हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा दुसरा टप्पा होणार आहे. यासंदर्भात बुधवारी पीएमआरडीएची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने शिवाजीनगर –हिंजवडी मेट्रोसाठी तयार केलेला सविस्तर आराखडा सादर करण्यात आला. बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या दुस-या टप्प्याला मंजुरी दिली.
पीएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. पीएमआरडीएमच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून निधी उभारला जाईल असे सूत्रांनी सांगितले.
पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या दोन मार्गांचा समावेश आहे. मेट्रोच्या पहिला टप्पा मार्गी लागण्यास पुणेकरांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागली होती. आता भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात मेट्रो प्रवासासाठी आणखी किती वर्ष लागतील याची शाश्वती नाही. आता मेट्रोतील दुस-या टप्प्याला मंजुरी मिळाल्याने पुणेकरांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. पण या प्रकल्पासाठी लागणारा निधी उभारण्याचे आव्हान पीएमआरडीएसमोर आहे.