पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ कागदावरच राहणार?

जिल्ह्यात पुरंदर इथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामस्थांनी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रस्तावित विमानतळाविरोधात या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. 

Updated: Oct 13, 2016, 05:43 PM IST
पुरंदरचा  प्रस्तावित विमानतळ कागदावरच राहणार?

पुणे : जिल्ह्यात पुरंदर इथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामस्थांनी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रस्तावित विमानतळाविरोधात या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. 

पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात शेतकरी पुण्यातल्या रस्त्यावर उतरले. पुरंदरमधील सहा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विमानतळाला विरोधाचा ठरावही मंजूर करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर, पारगाव मेमाणे या भागाची एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने पाहणी केली. त्यानंतर तालुक्याचा विकास होण्याच्या कल्पनेने तालुकावासियांमध्ये आनंदाचं वातावरण होते. मात्र आता याच ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केला आहे. 

विमानतळासाठी चार ते सहा किलो मीटरपर्यंतची जागा जाणार असल्याने तिथे रेडझोन होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. जमिनी घेतल्या तर सरकारविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

या अगोदर सरकारने विमानतळासाठी पुण्याजवळील खेडची जागा निश्चित केली होती. त्याठिकाणच्या शेतक-यांनीही विमानतळाला विरोध केला होता. तसंच खेडची जागाही विमानतळासाठी अनुकूल नव्हती. आता पुरंदरमधील शेतक-यांचाही विमानतळाला जमीनी देण्यास विरोध आहे.