मुंबई/रत्नागिरी: मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.
कोकणात मुसळधार
गेल्या २४ तासात १९५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस रत्नागिरीत कोसळाय. राजापूर तालुक्यातील कुवेशीत शाळा कोसळी असून एका घरावर झाड कोसळंय. तर काल पासून पडणाऱ्या पावसामुळं तीन जणांचा बळी गेलाय.
राजापूर तालुक्यातील हातिवले गावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या संजय धाडवे यांचा मृत्यू झालाय. तर रत्नागिरीत घरावर दरड कोसळून एका महिलेसह एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
कोकण रेल्वेवर परिणाम
मुंबईत झालेल्या पावसामुळं कोकण रेल्वेवरही परिणाम झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळं रोहा ते सीएसटीपर्यंत कोकण रेल्वेच्या गाड्या पोहचायला अडचण येत आहे. सकाळी ६.५५ मिनिटांनी सुटणारी मांडवी एक्सप्रेस दुपारी ४.३० वाजता पनवेलहून सुटेल.
प्रतापगडाची तटबंदी गडाच्या पायथ्याशी ढासळली
शिव पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडाची तटबंदी आज सकाळी ११ सुमाराच्या गडाच्या पायथ्याशी ढासळली. कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं दूरवस्था झालेल्या गडाची तटबंदी ढासळलीय. गड चढताना पायऱ्यांच्या अलीकडेच हि घटना घडलीय. यामुळे रस्ता पूर्ण बंद असून पर्यटक गडावर अडकलेत. तर अद्याप बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचलेले नाहीत.
चंद्रपूरमध्ये धुवाँधार, नदिकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्री चंद्रपूर शहरात तब्बल २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जनजीवन पूर्णपणे ठप्प झालयं. यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी जमा झालंय. पावसामुळं शहरातील मुख्य मार्गावरून जातांना लोकांना चांगलीच कसरत करावी लागतेय.
चंद्रपूर शहरासोबतच काल रात्री कोरपना तालुक्यात १३७ मिलीमीटर तर राजुरा तालुक्यात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असल्यानं प्रशासन अतिशय सतर्क झालयं.
या मुसळधार पावसामुळं आजच्या योग दिनानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये मोठा व्यत्यय निर्माण झालायं. प्रशासनाने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.