पुन्हा अवकाळी पाऊस; स्वाईन फ्लू फैलावण्याची भीती

मार्च महिन्याला सुरुवात होतेय. त्यामुळे आता खरं तर उकाड्याचं वातावरण असायला हवं. मात्र, आज दुपारपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसानं हजेरीही लावली. यामुळे पिकांचं तर नुकसान होईलच शिवाय स्वाईन फ्लूही फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Updated: Feb 28, 2015, 07:39 PM IST
पुन्हा अवकाळी पाऊस; स्वाईन फ्लू फैलावण्याची भीती title=

मुंबई : मार्च महिन्याला सुरुवात होतेय. त्यामुळे आता खरं तर उकाड्याचं वातावरण असायला हवं. मात्र, आज दुपारपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसानं हजेरीही लावली. यामुळे पिकांचं तर नुकसान होईलच शिवाय स्वाईन फ्लूही फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मुंबई :
कालपर्यंत उन्हाच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांना आज हवेत चांगलाच गारवा अनुभवायला मिळाला. अचानक वातावरणात बदल झाल्यानं मुंबई आणि उपनगर ओलचिंब झालं. 
दादर, पवई, अंधेरी, सीएसटी परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. विकेंडला आलेल्या पावसानं मुंबईकर चांगलेच सुखावले. विकेंड आणि हवेतल्या गारव्याची मजा अनुभवण्यासाठी मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस या भागांत मुंबईकरांनी गर्दी केली. पण बदललेल्या वातावरणामुळे स्वाइन फ्लू आणखी बळावण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे मुंबईकरांनो आरोग्याची काळजी घ्या.
  
ठाणे : 
निसर्गाचा काही नेम नाही याची प्रचिती, ठाणेकरांना अनुभवायला मिळाली. ठाण्यात अवचित पाऊस बरसला आणि सर्वांची एकच तारांबळ उडाली. 
सकाळी चांगलं उन असताना कल्याण डोंबिवली भागातही, दुपारी अनपेक्षितपणे पावसानं हजेरी लावली. ईशान्य मुंबईतही आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या. अवकाळी पावसामुळे सकाळपासूनच हवेत गारवा होता. रस्ते ओलेचिंब झाल्यामुळे त्याचा फटका मात्र दुचाकी स्वारांना बसला. शहरात काही ठिकाणी निसरड्या रस्त्यांमुळे दुचाकी घसरून अपघात झाल्याच्या घटना ठिकठिकाणी पहायला मिळाल्या. 

रत्नागिरी :
रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरणासोबतच अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे आंब्याचं नुकसान होणार या भीतीनं आंबा उत्पादक शेतकरी धास्तावलाय. 

नाशिक :
नाशिकमध्ये पुन्हा एकदा तुरळक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वर्षभरातील हा सलग तेरावा अवकाळी बेमोसमी पाऊस आहे. आज सकाळपासूनच नाशिकमध्ये ढगाळ वातावरण होतं. हवेत गारवा आणि धुकं असल्यानं नाशिकचा द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.