मुंबई : पनवेलमधील एका रिसॉर्टवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं तीन दिवसांचं शिबीर झालं. या शिबीराचा समारोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणानं झाला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर राज ठाकरेंनी भावनिक भाषण केलं.
दहा वर्षांपूर्वी शिवसेना सोडताना लिहीलेलं पत्र राज ठाकरेंनी वाचून दाखवलं. या पत्रामध्ये शिवसेना आणि बाळासाहेबांना सोडण्याचा निर्णय कसा मानसिक क्लेश देणारा पण आवश्यक होता, इतर राजकीय पक्षांमध्ये न जाता मनसे स्थापन करायचा निर्णय का घेतला, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे सगळे मुद्दे राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मांडले.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला खिंडार पडतंय. मनसेचे नगरसेवक आणि पदाधिकारी मनसेसोडून शिवसेना-भाजपमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे मनसेला लागलेली गळती रोखण्याचं प्रमुख आव्हान राज ठाकरेंपुढे असणार आहे.