आवक वाढल्यानं तुरीचे दर गडगडले

तुरीचे दर हे पुन्हा एकदा गडगडले आहेत. काही महिन्यापूर्वी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या तूरीचे भाव कमालीचे घसरले आहेत.

Updated: Dec 26, 2016, 05:44 PM IST
आवक वाढल्यानं तुरीचे दर गडगडले  title=

लातूर : तुरीचे दर हे पुन्हा एकदा गडगडले आहेत. काही महिन्यापूर्वी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या तूरीचे भाव कमालीचे घसरले आहेत. तुरीच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या लातूर मार्केट मध्ये सध्या दररोज चार हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे.

शेतकऱ्यांच्या तुरीला कमीत-कमी ४३०० रुपये ते जास्तीत जास्त ४७०० रुपये प्रति क्विंटल इतका कमी भाव मिळत आहे. हा भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्यावर आला आहे. गेल्यावर्षी तुरीची लागवड कमी झाल्यामुळे बाजारात आवकही कमी होती. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांना ९५०० रु. भाव मिळाला होता. ज्यामुळे किरकोळ बाजारातील दर हे २०० रु.पर्यंत गेले होते.

गेल्यावर्षी तुरीला चांगला भाव आल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. त्यात पाऊस चांगला झाल्यामुळे तुरीचे पीक जोमात आलं. परिणामी सध्या बाजारात तुरीची आवक वाढल्यामुळे होलसेल बाजरात तूरडाळ ६५ रु.किलोप्रमाणे विकली जात आहे. तर मुगडाळही ६० रु.किलोने मिळू लागली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांना आता ७० ते ८० रु.किलोप्रमाणे डाळ मिळू शकणार आहे.

तर दुसरीकडे तुरीचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. तुरीचे उत्पादन जास्त झाल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान दररोज ०४ हजार क्विंटल असणारी आवक ही पुढील काही दिवस आणखी वाढणार असल्यामुळे तुरीचे उतरलेले दर हे आता स्थिर राहणार असल्याची शक्यता लातूरच्या तूर व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.