डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारी आश्वासनांचं 'रिअॅलिटी चेक'

संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं... सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का..? याचाच हा रिअॅलिटी चेक...

Updated: Apr 5, 2017, 11:29 AM IST
डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारी आश्वासनांचं 'रिअॅलिटी चेक' title=

मुंबई : संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं... सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का..? याचाच हा रिअॅलिटी चेक...

23 मार्च 2017... डॉक्टरांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळं रुग्णांचे प्रचंड हाल सुरू होते. डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केल्यानं रुग्णसेवा कोलमडली होती.. डॉक्टरांचा हा संप तत्काळ मिटावा, रूग्णांचे हाल कमी व्हावेत आणि डॉक्टरांनाही न्याय मिळावा, यासाठी 'झी 24 तास'नं घेतली कळकळीची, आग्रही आणि आक्रमक भूमिका... 'रुग्णांना वाली कोण?' असा खास रोखठोक कार्यक्रम आम्ही केला.

डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिलं. आश्वासन पाळलं नाही तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं, त्याला आता 15 दिवस उलटलेत. सरकारनं संपकरी डॉक्टरांना दिलेला शब्द खरा करून दाखवला का? डॉक्टरांना संरक्षण देण्याचं आश्वासन खरंच पाळलं का?  

काय आहेत डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या... 

1) सुरक्षा रक्षक

2) कायदेविषयक समितीची स्थापना

3) सुरक्षा समितीची स्थापना

4) रुग्णालयात अलार्म सिस्टीम

5) रुग्णांच्या नातेवाईकांना पास

6) डॉक्टर उपचारांवरील खर्च

7) केंद्रीय सुरक्षा रक्षक समिती

8) निवासी डॉक्टरांना क्षयरोग आणि प्रसूती रजा

9) निवासी डॉक्टरांचा 26/24 महिने कालावधी पूर्ण करणेबाबत

10) शिक्षा वाढवणे

11) मनपा वैद्यकिय महाविद्यालयांना तरतूदी लागू करणे

मुंबई

निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, मुंबईतल्या पालिका रुग्णालयांत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. डॉक्टरांवरच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षारक्षक तैनात करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. त्यानुसार पालिका रुग्णालयांत महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून, यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांबरोबरच सशस्त्र सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभागातही सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलंय. दरम्यान हॉस्पिटलमध्ये अलार्म यंत्रणा असावी ही एक मुख्य मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार केईएम रुग्णालयामधून या सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे. केईएममधल्या अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग यामध्ये सुद्धा ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. तसंच मुंबई शहरासाठी 500 सुरक्षा सुरक्षा रक्षक पुरवले जातील हे आश्वासनही मुंबईसाठी पूर्ण करण्यात आलंय. केईएम, नायर, सायन आणि कूपर रूग्णालयात 400 सुरक्षारक्षक रूजू झालेत. तर जेजे रूग्णालयात 89 सुरक्षारक्षक रुजू होतील. डॉक्टरांवरचे वाढते हल्ले रोखण्यासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्याकरता राज्य सरकारनं पाऊलं उचलायला सुरवात केली आहे.

ठाणे

ठाण्यातल्या रुग्णालयातही सुरक्षारक्षक दाखल झालेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 8 नवे सुरक्षा रक्षक दाखल झालेत. त्यापैकी दोघे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत. तसंच सीसीटीव्ही लावण्यात आलेत. तसंच एका रुग्णाबरोबर फक्त दोन नातेवाईक, असे पासेस द्यायला सुरुवात झालीय. तर पुढच्या आठवड्यात अलार्म सिस्टीम आणि सुरक्षा समितीची नेमणूक करण्यात येणार आहे.

पुणे

पुण्यातल्या ससुन रुग्णालयात आजपासून 50 सुरक्षारक्षक रुजू होणार आहेत. तसंच  एक रुग्ण एक नातेवाईक असे पासेस द्यायलाही सुरुवात झालीय. तर सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवले आहेत. अलार्म सिस्टीम अजून बसवण्यात आलेली नाही, मात्र या महिनाअखेरपर्यंत अलार्म सिस्टीम बसवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.