नाशिकमध्ये पाणीटंचाईमुळे रोटेशन पद्धतीने पाणीकपात

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाशिक महापालिकेनं रोटेशन पद्धतीनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतलाय.  

Updated: Feb 20, 2016, 09:28 PM IST
नाशिकमध्ये पाणीटंचाईमुळे रोटेशन पद्धतीने पाणीकपात title=

नाशिक : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाशिक महापालिकेनं रोटेशन पद्धतीनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आठवड्यातून एक दिवस विभागवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मात्र याला महापालिकेनं पाणीबचत असं नाव दिलंय. ही कपातच असली, तरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाणी वाचवावं, असं आवाहन महापालिकेनं केलंय. आहे तेच पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवण्यासाठी अशा बचतीची गरज असल्याचं आयुक्तांनी म्हटलंय.

एकलहरा औष्णिक केंद्राचे तीनशे एमसीएफटी पाणी शहराला मिळणार असून अधिक पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले.  यापूर्वीही हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राजकीय दबावामुळे तो मागे घेण्यात आला. 

नाशिकमधील पाणी टंचाईनं गंभीर स्वरुप धारण केलंय. मनमाडमध्ये तब्बल २१ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलाय.

जिल्ह्यातील भीषण टंचाई असलेले हे मनमाड गाव. या गावात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क एकवीस दिवसाआड पाणी मिळतंय. इंथल्या नागरिकांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. पिण्याच्या पाण्याचीचं भ्रंत असल्यानं अंघोळ करणं तर कधी कधीच नशिबात येतं. 

छगन भुजबळ यांचे चिरंजीन पंकज भुजबळ यांचा हा मतदार संघ. आमदारकीची दुसरी टर्म असून सुध्दा शहराच्या समस्या पंकज यांना सोडवता आल्या नसल्याचं चित्र आहे.