रायगड : मुरूडमधल्या सोमवारच्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यासाठी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू झालंय. सैफ अहमद असं या बेपत्ता मुलाचं नाव आहे. नौदल आणि तटरक्षक दलानं शोधमोहीम पुन्हा सुरू केलीये.
पुण्याच्या अबेदा इनामदार कॉलेजचे शंभरहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक सोमवारी सकाळी पुण्याहून मुरुडला सहलीसाठी आले. दुपारच्या सुमारास धम्माल मस्ती करण्यासाठी यापैकी काही विद्यार्थी समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं यातील काही विद्यार्थी समुद्रात ओढले गेले.
विद्यार्थी बुडत असल्याचं पाहून समुद्र किनारी गोंधळ उडाला. स्थानिकांनी मागं पुढं न पाहता समुद्रात उडी घेऊन बुडणा-या विद्यार्थ्यांना वाचवलं. मात्र मजा मस्तीच्या नादात काहींना आपला जीव हकनाक गमवावा लागला.
समुद्रात बुडताना बचावलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
बेपत्ता विद्यार्थ्याला शोधण्यासाठी विशेष शोध मोहिम राबवण्यात आली. वेगवान गस्ती नौका सीजी 117, एक चेतक हेलिकॉप्टर आणि गस्ती नौकेतून विशेष शोध अभियान राबवण्यात आलं.
या समुद्र किना-यावर याआधीही तरुण-तरुणी बुडाल्याच्या घटना घडल्यात. मात्र त्याबाबत सरकारनं खबरदारीच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.