रत्नागिरी : बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन चाललेल्या एकाला पोलिसांनी अटक केली. विवेक पद्माकर सप्रे असं या व्यक्तीचं नाव आहे. अटक करण्यात आलेला विवेक हा तालुक्यातील भू गावचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा बिबट्या कधी मारला गेला आहे आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे, याची तपासणी आता केली जाणार आहे. बिबट्याचे कातडे घेऊन विवेक सप्रे राजापूरला येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विवेकला अटक केली.
विवेककडे साडेसहा फूट लांबीचे बिबट्याचे कातडे सापडले. अंतरराष्ट्रीय बाजारात या कातडी किमंत लाखो रूपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे कातडे नेमकं कोणाला विकायला आला होता, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.