कपिल राऊत, ठाणे : सिव्हील हॉस्पीटलच्या गलथान कारभाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. आपल्या पाच वर्षीय बाळाला पुण्याहून घेऊन आलेल्या रामा लिंगायत यांना संपाचे कारण देऊन हाकलून देण्यात आले.
मुलाचा जीव वाचवण्यासाठी भर पावसात या बापाला वाट पाहावी लागली. पण झी मीडियाच्या दणक्यानंतर या बाळाला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.
सिव्हील रुग्णालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसते. दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयाच्या निष्काळजीपनामुळे झालेला एका महिलेच्या मृत्यू, त्यानंतर राष्ट्रवादीनं केलेलं आंदोलन आणि त्यामुळे डॉक्टरांनी अचानक पुकारलेला संप. हा संप एका चिमुकल्याच्या जीवावर बेतणार होता.
उपचारासाठी पुण्याहून आपल्या ५ वर्षीय बाळाला घेऊन आलेल्या गरीब मजुराला डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत दुस-या दिवशी येणास सांगण्यात आले. या चिमुकल्याला हिमोफिलिया हा रक्ताशी निगडीत असाध्य आजार झालाय. या रोगात रुग्णाच्या शरीरातील रक्त साखळण्याची प्रक्रिया बंद होते. त्यामुळे एखादी किरकोळ जखम सुद्धा या रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकते. परंतु याचे सोयरसुतक नसलेल्या सिव्हील रुग्णालयातील प्रशासनाने त्यांना भरपावसात उघड्यावर सोडून दिले.
एका झाडाखाली आपल्या बाळाला उराशी कवटाळून हा बाप सकाळ होण्याची वाट पाहत बसला होता. झी मीडीयाच्या टीमला या अन्यायाची बातमी कळताच याचा जाब रुग्णालय प्रशासनाला विचारला असता ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु मीडियाच्या दाबावापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. त्यांनी लागलीच बाळाला दाखल करून योग्य उपचार सुरु केले. झी मीडियाच्या दणक्यामुळे एका निष्पाप बाळाचे प्राण वाचले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.