माधव चंदनकर, भंडारा : ३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... पण भंडारा जिल्ह्यात वन्यजीव प्रेमी, गेल्या चार महिन्यांपासून चिंतेत आहेत. त्यांच्या या चिंतेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणखीनच भर घातलीय.
व्याघ्रसंरक्षण आणि संवर्धनासाठी २०१३ मध्ये भंडारा जिल्ह्यात कोका अभयारण्य घोषीत करण्यात आले. अभयारण्याच्या कडेला लागून असलेले नवेगाव बांध आणि नागझिरा अभयारण्य... यामुळे हे जंगल वाघांसाठी उत्तम पर्यावास ठरलं. 'अल्फा' वाघीण आणि 'डेंडू' वाघ म्हणजे या जंगालाची शान... या जोडीमुळे काही वर्षातच अभयारण्याला भरभराट आली आणि पर्यटकांची पावलंही अभयारण्याकडे वळू लागली.
मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या अभयारण्याला जणू अवकळाच आलीय. कारण ढाण्या वाघांची ही जोडी चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. शावक २४ महिन्यांचे होईपर्यंत वाघीण त्यांना एकटं सोडत नाही. मात्र, अल्फा वाघीण तिच्या १४ महिन्यांच्या तीन शावकांना सोडून गेल्यानं वन्यजीव प्रेमींची चिंता आणखीनच वाढलीय.
वाघांच्या या जोडीचा शोध घेण्यासाठी वनविभागानं जंगात अनेक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले मात्र त्यातही हे दोन्ही वाघ दिसून आले नाहीत.. वाघांच्या अशा अचानक गायब झाल्यानं पर्यटकांनीही या अभयारण्याकडे पाठ फिरवलीय.
या जंगलातून वाघ बेपत्ता झाल्याची ही पहिलीच घटना नाही. पाच वर्षांपूर्वी याच जंगलातील 'राष्ट्रपती' नावाचा वाघही असाच अचानक बेपत्ता झाला होता. अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रपतीचं जे झालं तेच या वाघांच्या जोडीचं तर झालं नाहीना अशी चिंता वन्यजीवप्रेमींना सतावतीय.