गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उत्तम वनं आणि वन्यजीव यासाठी प्रख्यात असलेल्या आलापल्ली वनविभागात वाघाची शिकार झाल्याचं प्रकरण उजेडात आलंय.
मुख्य म्हणजे यात वन कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यानं वनाधिकारी हाय अलर्टवर आहेत. या प्रकरणाची सुरुवात तेलंगणा राज्यात झाली.
गुड्डूर परिसरात वाघाच्या कातडी आणि नखांचा सौदा करत असल्याप्रकरणी तिथल्या पोलिसांनी २ व्यक्तींना ताब्यात घेतलं. या प्रकरणाची चौकशी करत तेलंगणा पोलिसांचे एक पथक आलापल्ली येथे पोचले. वन्यजीव आणि भौगोलिकदृष्ट्या हा परिसर शेजारी असल्याने वनाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले.
या प्रकरणाच्या तपासात आलापल्ली वनविभागाअंतर्गत पेरमिली वनक्षेत्रातील कोंदावाही बिटातील राखीव वन क्षेत्र क्रमांक ६६ मध्ये एका वाघाची शिकार करून त्याच्या कातडीची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली. या घटनेत अन्य अकरा आरोपींसोबतच या प्रकरणात दोन वनरक्षकांचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले.
वनविभागात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुपेश सुरेश तुरेर्वार रा. आलापल्ली आणि तुषार हेमंत बेपारी रा. शांतीग्राम अशी या वनरक्षकांची नावे असून हे दोघेही मार्कंडा वनपरिक्षेत्रात कार्यरत आहेत. या दोघांवर गुन्हे दाखल झालेत. केवळ कर्मचारीच नव्हे तर अधिकाऱ्यांवरही या प्रकरणी कठोर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे.