ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं टळला कोकण रेल्वेवरील अपघात

कोकण रेल्वेमार्गावरील एका ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं कोकणकन्या एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे. सचिन पाडावे असं त्या ट्रॅकमनचं नाव आहे.

Updated: Nov 10, 2014, 05:34 PM IST
ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं टळला कोकण रेल्वेवरील अपघात title=

रत्नागिरी: कोकण रेल्वेमार्गावरील एका ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं कोकणकन्या एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे. सचिन पाडावे असं त्या ट्रॅकमनचं नाव आहे.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ इथल्या एका पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटला असल्याचं पाडावे यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्वरित रेल्वे कंट्रोल रुम आणि उक्षी स्टेशनला त्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत उक्षी स्टेशनवरून कोकणकन्या एक्स्प्रेस सुटली होती.  

ताशी ७५ किमी वेगानं येणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसला थांबवणं गरजेचं होतं. त्यामुळं क्षणाचाही विलंब न करत सचिन तुटलेल्या ट्रॅकपासून उक्षी स्टेशनच्या दिशेनं धावत सुटले आणि हातातील बॅनरनं उक्षीच्या बोगद्याजवळ आणि तुटलेल्या ट्रकच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर कोकण कन्या एक्स्प्रेस थांबवली आणि अपघात टाळला. 

जर पाडवे यांनी प्रसंगावधान दाखवत एक्स्प्रेस थांबवली नसती तर ती पुलावरून थेट खाली नदीत कोसळली असती आणि मोठी दुर्घटना झाली असती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.