चंद्रपूर: चंद्रपूरचे भाजप खासदार हंसराज अहिर यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
हंसराज अहिर यांच्या गोलबाजार येथील घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. अहिर यांचा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. आता ते केंद्रात राज्यमंत्री झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांनीही समाधान व्यक्त केलंय.
युपीए सरकारच्या काळातील कोट्यवधी रूपयांचा कोळसा घोटाळा गाजला. हा घोटाळा उघड करण्यात हंसराज अहिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नागपुरात झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचा खास उल्लेख केला होता. त्यामुळं चार वेळा चंद्रपूरमधून लोकसभेवर निवडून आलेल्या अहिर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र त्यासाठी ६ महिने वाट पाहावी लागली.
१९८०च्या दशकात अहिर यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात केली. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात भाजपचा सामाजिक आधार वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलीय. आता राज्यमंत्रीपदाच्या रूपानं त्यांना त्याचं फळ मिळालंय. १० दिवसांपूर्वीच चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद देण्यात आलं. आता अहिर यांच्या माध्यमातून चंद्रपूरला थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. त्यामुळं चंद्रपूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.